देशसेवेतून सेवानिवृत्तीनंतर समाजसेवेसाठी योगदान द्यावे - अनिल वाढवणे

 

पारनेर 

      समाजातील प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून समाजासाठी काम केले पाहिजे. देशसेवा करून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य समाजाच्या हिताच्या कामासाठी खर्च करून सामाजिक कामात योगदान देणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांनी व्यक्त केले.


         पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील विठ्ठल बबन वाढवणे हे भारतीय सैन्यदलातील २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश काळे, माजी सरपंच लहू थोरात, माजी सरपंच भास्कर शेळके, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, माजी उपसरपंच संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू थोरात, श्री दत्तकृपा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल अडसरे, माजी प्राचार्य साहेबराव थोरात, पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल वडझिरे चे संस्थापक जयसिंग लंके, सेवा संस्थेचे संचालक शिवाजी बबन वाढवणे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

         यावेळी बोलताना अनिल वाढवणे म्हणाले की, समाजातील प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या आयुष्यातील काही वेळ समाजासाठी देणे गरजेचे आहे. अनेकजण अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत असतात. त्यांना कामाचा खूप मोठा अनुभव असतो. याच अनुभवाचा वापर आपण आपल्या गावच्या विकासासाठी केला तर गावची प्रगती होण्यासाठी वेळ लागणार नाही. ज्यांना ज्यांना शक्य होईल तेवढा वेळ समाजासाठी द्यावा असेही वाढवणे म्हणाले. सुभेदार विठ्ठल वाढवणे यांची गावातून मिरवणूक काढून सहकुटुंब सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत कदम यांनी केले तर आभार माजी सरपंच लहू थोरात यांनी मानले.

Post a Comment

0 Comments