पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी सांगवी सुर्या पंचक्रोशीतील आठ ते दहा गावांच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातील सांगवी सूर्या ,जवळे ,पठारवाडी, निघोज, वडुले, पिंपळनेर, पानोली, गांजीभोयरे या परिसरात प्रचंड गारपीट होऊन पिके नष्ट झाली .
या परिसरातील फळपिके, कांदा,भाजीपाला पिके , द्राक्ष व केळीबागा, पूर्णपणे उध्वस्त झाल्या होत्या. गारपिटी नंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. राजकीय नेत्यांचे दौरे पार पडले परंतु कोणीहि तातडीची नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली नाही. परिसरातील या गावांची चारा पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेजारील गावांतून जनावरांना चारा आणावा लागत आहे. शासनाने या ठिकाणी किमान दोन महिने चारा डेपो तातडीने सुरू करावा अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देणे यावर्षीचे ,पीक कर्ज शासनाने भरण्याची हमी घेणे ,अशा मागण्या अशा प्रमुख मागण्यांसह शेतकरी आक्रमक आहेत. यावेळी आपल्या जनावरांसोबत शेतकरी उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत. सध्या साखळी उपोषण चालू केले आहे. परंतु , जर शासन, प्रशासणाकडून दखल घेतली नाही तर ,तीन दिवसांनी याच ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
आमच्या आमदार , खासदारांनी आमचा प्रश्न चालु अधिवेशनांत मांडावा अशी सर्वांनी मागणी या वेळी केली . या मागण्यांचे ग्रामसभांचे ठराव घेवून प्रशासनाला उपोषणाचे पत्रव्यवहार करण्यात आले आहेत . तालुका प्रशासनाकडून नायब तहसीलदार , तलाठी, पोलिस प्रशासनाने उपोषाकर्ते यांची भेट घेवून तुमच्या तीव्र भावना शासणाकडे पोहचवण्याचे सांगीतले. यावेळी परीसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासनाविरोधी नाराजी व्यक्त करून घोषणाबाजी केली.

0 Comments