क्रांती शुगरला गाळप परवाना देऊ नये; पारनेर बचाव समितीची मागणी
पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेणाऱ्या क्रांती शुगर पुणे या कंपनीला सन २०२३ – २४ चा गाळप हंगाम परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी साखर आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने याबाबत मागणी केली आहे. याबाबत बचाव समितीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिक माहिती देण्यात आली आहे की, पारनेर सहकारी साखर कारखान्याचे सन २०१५ ला राज्य सहकारी बँकेने खाजगीकरण करून तो क्रांती शुगर पुणे या कंपनीला विक्री केला होता . त्यानंतर क्रांती शुगरने पारनेरच्या मालमत्तेवर ताबा घेऊन सात गाळप हंगाम घेतले आहेत https://rokhthoknews.blogspot.com/2023/10/blog-post_5.html
क्रांती शुगर यांनी पारनेर कारखान्याची मालमत्ता बेकायदा अदलाबदल केल्याप्रकणाचा निकाल जून महिन्यात पारनेर कारखान्याच्या बाजूने लागला आहे . राज्य शासनाच्या या निकाला विरोधात क्रांती शुगरने उच्च न्यायालयात अपिल केले आहे .
राज्य शासनाच्या निकालानंतर कारखाना बचाव समितीने अधिक माहिती घेतली असता,
पारनेर कारखान्याचा केंद्रीय औद्योगिक परवाना गेल्या सात वर्षांपासून क्रांती शुगरने बेकायदा वापर केल्याची माहिती समोर आली आहे . क्रांती शुगर या कंपनीची मूळ नोंदणी श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील असून पुणे येथे त्यांचे मुख्यालय आहे . वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे साखर निर्मिती लायसनची मागणी करताना पारनेर कारखान्याचे सर्व केंद्रीय परवाने हे आमचे असून त्यावरून क्रांती शुगरने साखर निर्मितीचा परवाना मिळवल्याची बाब समोर आली आहे . पारनेर सहकारी कारखान्याची काही मालमत्ता क्रांती शुगरला हस्तांतरण करताना झालेल्या करारात कोणतेही परवाने हस्तांतरण झालेले नाहीत. पारनेर कारखान्याच्या संमती विना केंद्रीय औद्योगिक परवाना क्रांती शुगरने सात वर्षांपासून वापरलेला आहे. क्रांती शुगरने उभारलेल्या नवीन युनिटसाठीही हाच परवाना वापरण्यात आलेला आहे. ही बाब बेकायदा आहे. म्हणून यावर्षीचा गाळप परवाना क्रांती शुगर यांना देण्यात येऊ नये, यापुर्वी च्या देण्यात आलेल्या परवान्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पारनेर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त पुणे यांची भेट घेऊन केली आहे. साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. हरकत घेवूनही क्रांती शुगरला या हंगामाचा गाळप परवाना दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पारनेर बचाव व पुनर्जीवन समितीने दिला आहे.


0 Comments