कला क्षेत्रात करिअरसाठी अगणित वाटा - मा.सभापती राहुल भैया झावरे


पारनेर तालुका कलाभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा 

पारनेर प्रतिनिधी (चंद्रकांत कदम)

पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयांमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग व पारनेर तालुका शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने कलाशिक्षक कार्यशाळा,पारनेर कलाभूषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.


   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुलभैय्या झावरे होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने झाली.यावेळी न्यू इंग्लिश स्कूल पारनेरचे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारातील चित्रांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलभैया झावरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पकार प्रा.संजय काळे,शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे,न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बी.बी. करंजुले,कलाशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पठाडे,सचिव रवींद्र गायकवाड,पारनेर तालुका अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार मार्तंड बुचुडे,विनोद गोळे,राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे आदी उपस्थित होते.


    पारनेर तालुक्यातील जेष्ठ कलाशिक्षक कैलास विटनाेर व कलाशिक्षिका कलाश्रुती वाळुंज यांना मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन पारनेर कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच पारनेर तालुक्यातील विविध शाळातील शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत 'अ' श्रेणी उत्तीर्ण झालेल्या तब्बल ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.राज्य रेखाकला परीक्षा मंडळावर जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.


      यावेळी माजी सभापती राहुल झावरे म्हणाले ' कला 'ही ईश्वराची देणगी आहे ज्याच्या हातामध्ये सरस्वती आहे.तोच कलेमध्ये पुढे जातो त्यासाठी जीवनामध्ये केलेला फार मोठा वाव आहे.विद्यार्थ्यांचा कलाविषयाकडे कल असल्यास त्यांना पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. आज कमर्शियल,ॲनिमेशन, ग्राफिक्स,व्हि पी एक्स डिझाईन,वेब डिझाईन या क्षेत्रात तंत्रज्ञ कलाकारांना मोठी मागणी आहे. या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी निश्चितच करिअरच्या दृष्टीने बघावे. यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध चित्रकार पाबलो पिकोसो यांचे उदाहरण दिले.


     जिल्हाध्यक्ष संजय पठाडे सर यांनी सांगितले गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी जेव्हा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली होती तेव्हा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा कलाक्षेत्राकडे दिसून आला होता परंतु या विषयाला अनुकूल वातावरण देण्यासाठी सरकार,प्रशासन आणि एकूणच समाज व्यवस्था सुद्धा कमी पडत आहे.अशी त्यांनी खंत व्यक्त केली. ५० % शाळांना प्रशिक्षित कला शिक्षकच नाहीत शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक देऊन ही कला शिक्षकांना इतर विषय दिले जातात.कला शिक्षकांची भरती होत नाही आणि पहिल्यांदाच राज्याच्या कलाविषयाच्या बोर्डावर माझी नेमणूक झाल्यामुळे आता या विषयांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याचे आमचे प्रयत्न राहतील.


कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात जिल्हाध्यक्ष संजय पठाडे व सचिव रवींद्र गायकवाड यांनी कला शिक्षकांच्या विविध शंका चे समाधान केले. यावेळी सचिव मंगेश काळे,कार्याध्यक्ष प्रा.संजय खोडदे, खजिनदार साहेबराव घुले,महिला आघाडी प्रमुख प्रतिभा फलके यांनी मनोगते व्यक्त केली.तसेच या चर्चा सत्रात तालुक्यातील सर्व कलाशिक्षक बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी लोकमान्य टिळक जयंती चे सुंदर फलक रेखाटनाचे प्रात्यक्षिक केले.

 

Post a Comment

0 Comments