पारनेर प्रतिनिधी
किल्ला बनवणे स्पर्धेत वडनेर बु. येथे साकारलेल्या जंजिरा किल्ल्याला पारनेर व शिरूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शिवबा संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
मयूर अशोक वाजे, ओम लक्ष्मण गायकवाड, साहिल सुभाष वाजे आणि सुजल सुभाष वाजे या लहानग्यांनी जंजिरा किल्ल्याची हुबेहुब व मनमोहक प्रतिकृती बनवली आहे.
या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला पूर्णतः पर्यावरणपूर्वक आणि टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून तसेच छोट्या छोट्या बाबींचा अभ्यास करून बनवला आहे. समुद्राचे पाणी, बोटी, तटबंदी, किल्ल्यावरील गोड्या पाण्याचे साठे, तोफा, अशा अनेक गोष्टी या प्रतिकृतीत पहावयास मिळतात. विशेष बाब म्हणजे १२ ते १५ वयाच्या मुलांनी प्रौढांच्या मदतीशिवाय हा मनमोहक किल्ला साकारला आहे. हा किल्ला बनवताना इतिहासाच्या पुस्तकांबरोबर गुगल नकाशाचाही त्यांनी आधार घेतला होता.
प्रा. राजेंद्र महाजन व प्रा. प्रल्हाद सोनार यांनी स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केला. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे आणि ग्रामस्थांनी स्पर्धकांचे कौतुक करून अभिनंदन केले.
किल्ला बनवणे म्हणजे मुलांच्या बुद्धी आणि कौशल्याचा कस लावणारी गोष्ट आहे. यातून इतिहास, भूगोल, स्थापत्यशास्त्र, आर्थिक नियोजन, वेळेचे नियोजन, व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन असे प्रात्यक्षिक शिक्षण मिळणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक आहे. पालकांनीही मुलांना यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे..
विकास बबन वाजे (संस्थापक अध्यक्ष ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु.)
0 Comments