...
आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ प्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आंदोलनामुळे काही काळ लसीकरण बंद ; लसीकरणाला नागरिकांची गर्दी
पारनेर / प्रतिनिधी
महिनाभरापूर्वी आ. निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉ मनीषा उंद्रे व कर्मचारी यांनी काही काळ कामबंद आंदोलन करत आ.लंके यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे काही काळ लसीकरण ठप्प झाले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
४ ऑगस्ट रोजी आ. निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राहुल पाटील यांना लसिकरणाचे टोकन विकल्याचा आरोप करत मारहाण केली होती तसेच महिला वैद्यकीय अधीक्षक डॉ मनीषा उंद्रे, डॉ श्रद्धा अडसूळ यांना शिवीगाळ केली होती. याबाबतची तक्रार डॉ उंद्रे यांनी जिल्हा शैल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर अनेक दिवस हे कर्मचारी कामावर येत नव्हते. मंगळवारी या कर्मचाऱ्यांनी आ. लंके यांनी केलेल्या मारहाण व शिवीगाळीच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन करण्यात आले. कोव्हीड रुग्णांना उपचारात कुठलीच कसर ठेवणार नसून फक्त लसीकरण करणार नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उंद्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी लसीकरण बंद केल्याने लसीकरणासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, राहुल पाटील शिंदे यांनी मध्यस्ती केल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम पूर्ववत सुरू केले.
नोकरांना देखील चांगली वागनुक मिळते यापेक्षा खालच्या पातळीवरची वागणूक आरोग्य कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून मिळत असल्याची खंत डॉ मनीषा उंद्रे यांनी व्यक्त केली. मारहाणीचा व शिविगळीचा प्रकार पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या समोर घडून देखील त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने आम्ही कामे करावे की नाही असा सवाल डॉ उंद्रे यांनी यावेळी केला आहे. घटना घडल्यापासून ६ ऑगस्ट पासून डॉ उंद्रे या कामावर हजर नसून डॉ श्रद्धा अडसूळ यांनी कामाचा राजीनामा दिला आहे. समाजामध्ये महिलांची गळचेपी होत असेल व त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काम करण्याची मुभाच भेटत नसेल तर भविष्यात मुलींना शिकवायचे की नाही ? असा सवाल डॉ श्रद्धा अडसूळ यांच्या वडिलांनी केला आहे. सध्या पारनेर ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या एकमेव डॉ अभिलाषा शिंदे या देखील एक महिन्याच्या आत काम सोडणार असल्याचे बोलले जात आहे. महिला तहसीलदार ज्योती देवरे देखील या सर्व परिस्थितीला सामोऱ्या जात असून त्यांची देखील मनस्थिती खचून गेलेली आहे. स्वातंत्रसेनानी पराशर ऋषींच्या व जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारेंच्या पारनेर तालुक्यात उच्चविभूषित महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात आडकाठी आणून त्यांना कामे सोडण्याची वेळ येत असेल तर याबाबत सुज्ञ पारनेरकरांनी नक्कीच विचार करायला हवा. एक महिला तहसिलदार एका बाजुला आणि समोर सर्व एकवटलेले महिला अधिकाऱ्यांच्या समोर. अशा परिस्थितीत सर्व संयमाने घेऊन त्या कशा काय लढतात याबाबत सर्वांना सहानुभूती वाटते आहे.


0 Comments