महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण ; ४ जणांवर गुन्हा दाखल
महावितरणाच्या वडझिरे कक्षातील ऑपरेटरला केली मारहाण ; पारनेर पोलिसांत तक्रार
पारनेर प्रतिनिधी
महावितरणाच्या पारनेर तालुक्यातील वडझिरे कक्षातील ऑपरेटर म्हणून काम करत असणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याला महावितरण कार्यालयात जाऊन मारहाण केलेप्रकरणी वडझिरे येथील ४ जणांवर पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील वडझिरेतील गंधाकते मळ्यात विजेची तार तुटून अंगावर पडल्याने किसन प्रभाकर गंधाकते या शेतकऱ्याच्या जर्शी जातीच्या गाईचा जागीच मृत्यू झाला. गायीला विजेच्या तारेचा स्पर्श झाला असून वीजपुरवठा खंडित करावा यासाठी तेथील शेतकऱ्यांनी महावितरणाच्या वडझिरे कक्षात फोन लावला. परंतु तेथील ऑपरेटरचे फोनवर वरिष्ठांशी बोलणे चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचा फोन उचलला नाही. यामुळे रागात आलेल्या विष्णू प्रभाकर गंधाकते, बाबाजी प्रभाकर गंधाकते, सुनील किसन गंधाकते, किरण किसन गंधाकते सर्व रा. वडझिरे यांनी महावितरणच्या कार्यालयात येऊन "आमचा फोन उचलला नाही, तुझ्यामुळेच आमची गाय मरण पावली." असे म्हणत कार्यालयात काम करत असणाऱ्या ऑपरेटर ओंकार सुभाष गाडेकर(रा.पिंपरी जलसेन) यांना शिविगाळ करत लाकडी दांडक्याने खाली पडून मारले. महावीतरणाचे ऑपरेटर ओंकार गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विष्णू प्रभाकर गंधाकते, बाबाजी प्रभाकर गंधाकते, सुनील किसन गंधाकते, किरण किसन गंधाकते सर्व (रा वडझिरे ता- पारनेर) यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३३४,३२३, ५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर हे करत आहेत.

0 Comments