राळेगण - कुरुंद रस्तावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
पारनेर परिवर्तन, शिवबा संघटनेच्या लढ्याला यश
रोख-ठोक न्युज इफेक्ट
चंद्रकांत कदम पारनेर
राळेगण थेरपाळ ते कुरुंद , गव्हाणवाडी रस्त्याची खूप दुरावस्था झालेली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबत पारनेर परिवर्तन, शिवबा संघटना व रोख-ठोक न्यूजने आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कुरुंद परिसरातून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
राळेगण ते कुरुंद रस्ता हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर गाड्या चालवणे वाहनचालकांना मुश्किल झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. याबाबत पारनेर परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला होता. राळेगण ते बेल्हे या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत देखील पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत रोख-ठोक न्यूज ने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. राळेगण ते कुरुंद रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तालुक्यात इतर ठिकाणी कुठलेच नवीन कामांना सुरुवात होऊ देणार नसल्याचा सज्जड इशारा पारनेर परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे यांना दिला होता. त्याचीच दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास शनिवारी कुरुंद परिसरात सुरुवात करण्यात आली आहे.
पारनेर परिवर्तन व शिवबा संघटनेने या रस्त्याच्या कामाबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर या रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली असून काही दिवसांत हे काम सुरू होईल असे सांगण्यात आले होते .परंतु नवीन काम जेव्हा व्हायचंय तेव्हा होऊद्या आधी हे खड्डे बुजवा अन्यथा मोठे काम होऊ देणार नाही अशी आग्रही भूमिका पारनेर परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्जड इशारा दिला होता. त्यानंतर आज शनिवारी (दि.१०) खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाली असून पुढील १५ दिवसांत नवीन काम देखील सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी पारनेर परिवर्तन, शिवबा संघटना व रोख-ठोक न्यूजचे आभार मानून समाधान व्यक्त केले जात आहे.
रस्त्याची कामे व्यवस्थित करावी लागतील. तसेच ठेकेदार व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने कामात झालेला हलगर्जीपणा व कामाच्या दर्जा खालावल्यास हे खपवून घेतले जाणार नाही. पारनेर परिवर्तनचे तालुक्यातील कामांवर बारीक लक्ष असून कामात हलगर्जीपणा केल्यास पारनेर पारीवर्तनचा हातोडा असणार असल्याचा इशारा पारनेर परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिला आहे.


0 Comments