महावितरण आणि ठेकेदाराचा घोळात पिंपरी जलसेनकर ८ दिवसांपासून अंधारात
चंद्रकांत कदम पारनेर
आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेचे खांब पडून पिंपरी जलसेनमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. पडलेले खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे काम ठेकेदाराला दिले असून ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देऊन कामास टाळाटाळ करत असून पिंपरी जलसेनमधील काही भाग ८ दिवसांपासून अंधारात आहे. याबाबत महावितरणकडून हे काम ठेकदाराचे असल्याचे सांगून कानावर हात ठेवण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यातील मंगळवार, बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे पिंपरी जलसेन मधील कदम मळा व परिसरातील विजेचे खांब व तारा तुटल्या होत्या. तेव्हापासून घरगुती वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत महावितरणला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी नवीन खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी महावितरणच्या वतीने नेमून देण्यात आलेल्या ठेकेदाराला सांगितले होते. वीजपुरवठा खंडित होऊन ८ दिवस होत आले असून अद्याप देखील ठेकेदाराकडून कदम मळा व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात आला नाही. ग्रामस्थांनी वारंवार ठेकेदाराशी संपर्क केला असता कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही, एक दिवसात काम करून देतो अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. महावितरणचे अधिकारी देखील याबाबत मूग गिळून गप्प असून दुरुस्तीच्या कामाचा ठेका ठेकेदाराला दिला असून हे काम ठेकेदारच करून देईल. तुम्ही ठेकेदाराशी संपर्क करा असे नागरिकांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महावितरण व ठेकेदार यांच्या घोळात नागरिक मात्र ८ दिवस अंधारात आहेत. कामास टाळाटाळ करत असणाऱ्या ठेकदाराला महावीतरणाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत का ? या ठेकेदाराबाबत महावितरणचे अधिकारी नेमकी काय कारवाई करतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
या कामाचा ठेका निघोज येथील ठेकेदाराला देण्यात आला आहे. वडझिरे विभागातील सर्व दुरुस्तीचे कामे ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. परंतु पिंपरी जलसेन येथील कामाबाबत ठेकेदाराकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. आम्ही याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. गौरव चरडे - उपअभियंता वडझिरे महावितरण कक्ष

0 Comments