पिडीत लोकांच्या न्याय हक्कासाठी नाशिकच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषण करणार- अरुण रोडे

 

(सैनिक बँकेतील निराधार योजनेतील रक्कम हडप प्रकरण)

पारनेर/प्रतिनिधी

 संजय गांधी निराधार योजनेतील रक्कम हडप करणाऱ्या त्या सैनिक बँकेच्या अधिकारी व सर्व पदाधिकाऱ्यांवर शासकीय गुन्हा दाखल करावा या मुद्यासह पारनेर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत स्थरावरील प्रलंबित प्रश्न व भ्रष्टाचार बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती पारनेर यांच्याकडे अनेकदा तक्रारी करून देखील संबंधितांवर कारवाई केली जात नसून  भ्रष्टाचारास अभय देणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी २४ नोव्हेंबर रोजी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व सेवा समितीचे कार्यकर्ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे साखळी उपोषण करणार आहेत. तसे पत्र संबधित खात्याला देण्यात आले आहेत.


 उपोषणा संदर्भात जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितले की पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी यांनी संगनमताने संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेतील अनुदान रक्कम हडप केली आहे तसा अहवाल जिल्हा लेखापरीक्षकांनीं सहकार आयुक्त यांना दिला होता.त्यावर सहकार आयुक्त यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. कर्जत तहसीलदार यांनी  बँकेतील शासकीय रक्कम शाखाधिकारी  सदाशिव फरांडे  व क्लार्क दीपक अनारसे यांनी संगनमताने हडप केल्याने या दोघावर चौकशी करून शासकीय गुन्हा दाखल करून घ्यावा असे पत्र कर्जत पोलिसांना १९.९.२०१९ रोजी दिले होते मात्र कर्जत पोलिसांनी सहकार खात्याचा तपासणी अहवाल  व त्यात ते दोषी आढळले तरच शाखाआधिकारी यांच्यावर  शासकीय गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली होती. आता शासकीय लेखापरीक्षक यांचा अहवाल आला असून त्यात शाखा अधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी दोषी असूनही  शासकीय गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला जात आहे. या मुद्यासह  पारनेर तालुक्यातील काही ग्रामपंचायत स्थरावरील प्रलंबित प्रश्न व भ्रष्टाचार बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती पारनेर यांच्याकडे पुराव्या सह तक्रार करून त्याचा पाठपुरावा करून देखील संबंधितांवर कारवाई केली जात नाही . कारवाईस करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी या साठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर २४ नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात येईल असे पत्र  मुख्य सचिव मंत्रालय यांना व संबधित विभागाला निवेदनाद्वारे अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments