प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर विश्वावरील करोना संकट नष्ट होवो, असे साकडे उद्धव ठाकरे यांनी विठुमाऊलीचरणी घातले. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. यंदा मानाचे वारकरी म्हणून पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.
पंढरपूरः दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी उत्साहात साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
विठुमाऊलीसमोर इथे कुणी मुख्यमंत्री नाही, कुणी अधिकारी नाही, सर्वजण एकसारखे आहेत. विठ्ठल पूजेचा मान मला कधी मिळेल आणि अशा परिस्थितीत महापूजा होईल, याचा कधीही विचार केला नव्हता. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर विश्वाच्यावतीने माऊलीचरणी साकडे घातले आहे. लवकरात लवकर नव्हे, तर आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होवो. जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळे आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली. पंढरपुरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
दरम्यान, आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आषाढी यात्रा म्हटले की, ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. मानाच्या संतांच्या पादुका मंगळवारी सायंकाळी सरकारी नियमांच्या चौकटीत वाखरी येथे पोहोचल्या. या पादुका पहिल्यांदाच अवघ्या २० भाविकांसह एसटी बसेसमधून आणल्या गेल्या. पादुका उतरल्यावर सोबत आलेल्या सर्व मानकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जे पालखी सोहळे लाखोंचा वारकरी भक्तमेळा घेऊन चालतात त्यांना यंदा करोनामुळे बसेसमधून येण्याची वेळ आली.
वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि येथून सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले. करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवार दुपारपासून संचारबंदी सुरू झाली. शहरात द्वादशीपर्यंत संचारबंदी राहणार आहे. वैष्णवांचा मेळा जिथे जमतो त्या चंद्रभागेचं वाळवंटही सील करण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर सुगंधी फुलांनी सजवण्यात आले आहे.

0 Comments