रोख ठोक न्यूज:- चंद्रकांत कदम
बोगस बाजरीचे बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणारी बाजरी बियाण्याची त्या "नामांकित कंपनीवर" व त्या कंपनीला पाठीशी घालून शेतकऱ्यांच्या बाबतीत बेजबाबदार वागणाऱ्या पारनेर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी पारनेर तालुका परिवर्तन फौंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत पारनेर पोलिस निरीक्षकांना मंगळवारी (देि. ३०) रोजी निवेदन येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली.
विचारांची नांगरणी, कृतीची पेरणी व विकासाची उभारणी या तत्त्वाला कृतीची जोड देऊन पारनेर तालुक्यातील सुपुत्रांनो एकत्र येत तालुक्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी व महिला व तळागाळातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी "पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन" ची स्थापना केली आहे. या संस्थेच्या पदाधिकारी व सभासद यांचे आज वार्षिक सभा झूम ऍप द्वारे ऑनलाईन चर्चासत्र पार पडले. यावेळी शिक्षण, उद्योजगता, महिला सक्षमीकरण, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, नोकऱ्या, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन आदी ध्येय धोरणावर ही संस्था काम करणार आहे. पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावोगाव समाजपयोगी उपक्रम राबविणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व बळीराजाला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी शेतकरी ते ग्राहक (फार्म टू सोसायटी) या ऍग्रो कंपनी मार्फत शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती पारनेर तालुका परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तातडीने बाजरी बियाण्याची पेरणी केली. परंतु बाजरी बियाण्याच्या कंपनीने बोगस बियाणे दिल्याने बाजरी उगवली नाही व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे बाजरी बियाणे उगवले नसल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून संबधित बाजरी बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी सुमारे २० ते २१ दिवसांपूर्वी पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन ने केली होती. त्यावर तब्बल २० दिवसांनंतर परवा दि.२५ रोजी राहुरी कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी बाजरी उगवली नसलेल्या क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. त्यावर पारनेर तालुका कृषी अधिकारी सांगतात की, संशोधकांनी बियाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले असून निष्कर्ष अहवाल आल्यानंतर काय ते स्पष्ट होईल असे सरकारी कारण देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पारनेर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून होत असून ते संबधित कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केला आहे. बळीराजाला फसवणाऱ्या त्या संबंधित बाजरी बियाण्याच्या "कंपनीवर" व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पारनेर तालुका परिवर्तन फौंडेशनच्या वतीने पारनेर पोलिस स्टेशन येथे मंगळवारी ३० जून रोजी निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती भालेकर यांनी दिली.
या चर्चेदरम्यान अनेक समाजपयोगी बाबींवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. या चर्चेत पारनेर तालुका परिवर्तन फौंडेशनचे उपाध्यक्ष कवी देवा झिंझाड, विकास वाजे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक संजय वाघमारे, संतोष मापारी, सुभाष लोंढे आदींसह अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी - भालेकर
त्या कंपनीने बोगस बाजरी बियाणे दिल्याने पारनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ३० हजार नुकसान भरपाई त्या संबंधित बाजरी बियाण्याच्या कंपनीने द्यावी अशी मागणी पारनेर तालुका परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केली आहे.


0 Comments