मेहनतीने बाजरी पिकाची पेरणी करून देखील बाजरी बियाण्याच्या "त्या नामांकित" कंपनीने शेतकऱ्यांना खोटे बियाणे देऊन गंडा घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या "त्या नामांकित" कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख ताराचंद गाजरे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
देवीभोयरे, निघोज, पठारवाडी, जवळा, सांगवी सूर्या, पिंपरी जलसेन व सर्वच परिसरातील शेतकऱ्यांनी एका नामांकित कंपनीचे बाजरी बियाणे ठीक ठिकाणाहून खरेदी करून पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पुरेसा पाऊस होऊन देखील आठवडा होऊन देखील हे बाजरी बियाणे उगवले नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी चौकशी केली असता बऱ्याच ठिकाणी "त्याच नामांकित" कंपनीचे घेतलेले बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली एवढी मशागत वाया गेली असून पिकाचा एक हंगाम वाया जाणार आहे. शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. एकीकडे कोरोना मुळे सर्वच जण घरात बसून असल्याने आधीच आर्थिक स्थिती ढासळलेली असताना हात उसने करून बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी पैसे घेतले होते. त्यात हे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या त्या नामांकित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारनेर तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख ताराचंद गाजरे यांनी केली आहे.
याबाबत गाजरे यांनी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्याशी चर्चा केली आहे. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांनी बियाण्याची पाहणी केली असून त्यावर संशोधन करून निष्कर्ष दिल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कृषी अधिकाऱ्यांनी गाजरे यांच्याशी चर्चेदरम्यान सांगितले.
0 Comments