विविध मागण्यांसाठी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


पारनेर रोख ठोक न्यूज
        विविध मागण्यांसाठी अनेकदा तक्रारी करून देखील त्यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने तक्रारदारांची बाजू ऐकून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि.२२) रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

     सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील ढोकी येथे भर लोकवस्तीत घातकी स्फोटकाचे गोदाम आहे. हे गोदाम असणाऱ्या लोकवस्तीत अनेक नागरिक राहत असून या स्फोटकाचा स्फोट झाल्यास नागरिकांना  या गोदामापासून जीवितास धोका आहे. त्यामुळे तातडीने हे गोदाम सील करून त्याला इतरत्र हलवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी व नाशिक आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्याचप्रमाणे ढवळपुरी येथील शेतजमीन गेल्या ४ पिढ्यांपासून कसत असणाऱ्या शेतकऱ्याच्या परस्पर दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकच नावाच्या असल्याचे चुकीचे प्रतिज्ञापत्र करून विक्री करून मोठा अपहार करण्यात आला असल्याची तक्रार यापूर्वी देण्यात आली होती. याबद्दल जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.
       परंतु अद्याप यापैकी एक ही तक्रार दाराच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तीनही तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व अन्याय ग्रस्त तक्रारदारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा या मागणी साठी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, उपजिल्हाध्यक्ष आकाश वाबळे, कार्याध्यक्ष विकास झावरे, तालुका सचिव गणेश साळवे, तालुका अध्यक्ष कासोटे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर आदी सोमवारी २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमारण उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

Post a Comment

0 Comments