अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी
रोख ठोक न्यूजकारोना विषाणूमुळे हाहाकार माजला असताना सरकारकडून गोरगरिबांना मोफत व स्वस्तात गहू व तांदूळ पुरवत आहे.परंतु ग्राहकांची अडवणूक करून गोरगरिबांना स्वस्त धान्य न देता गरिबांची उपासमार घडवून आणणाऱ्या कर्जत तालक्यातील खेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील खेड येथील स्वस्त धान्य दुकानदार तेथील नागरिकांना धान्य न देणे, धान्य जास्त दराने विकणे, धान्य शिल्लक असताना शिल्लक नाही असे सांगणे, धान्याची पावती न देणे आदी तक्रारी नागरिकांकडून येत असल्याने युक्रांदचे कमलाकर शेटे यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने चौकशी होऊन व पुरावे असताना देखील सदर स्वस्त धान्य दुकानदारावर कर्जत तहसीलदार यांनी कारवाई केली नाही. तहसील प्रशासन दुकानदारास पाठीशी घातल्याचा आरोप कमलाकर शेटे यांनी केला होता. त्यावर अन्याय निर्मूलन सेवा समितीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करून त्यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था गोरगरिबांना मदत करत आहे. शासन स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देत असताना कर्जत तालुक्यातील खेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराला प्रशासनाचा वरदहस्त असल्याने गोरगरिबांना शासनाकडून मिळत असलेल्या मदतीपासून दुकानदार नागरिकांना वंचित ठेवत आहे. याबाबत कमलाकर शेठे यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून सर्व पुरावे दिले असून देखील तहसील प्रशासन दुकानदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तातडीने चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी. व चौकशी अहवाल अन्याय निर्मूलन सेवा समितीला देण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे. लवकरात लवकर चौकशी न केल्यास लॉक डाऊन संपल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील अरुण रोडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


0 Comments