रोख ठोक न्यूज पारनेर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रतिबंधासाठी कडक पाऊले उचलली आहेत. त्याच धर्तीवर प्रशासनाला सहकार्य करत गर्दी टाळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी (८ एप्रिल) होणारी पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील श्री काळभैरवनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक येत असतात.
कोरोना विषाणू ने जगात थैमान घातले असून भारतात व महाराष्ट्रात देखील जास्त प्रादुर्भाव झाला आहे. यावर उपायोजना म्हणून प्रशासनाने २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे. भांडगाव येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान हे जागरूक देवस्थान असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक या यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे गर्दी होऊ नये व कोरोना वर उपाययोजना म्हणून ८ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय भांडगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत सविस्तर निवेदन तहसीलदार व पारनेर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.
८ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने हनुमान जन्मोत्सव देखील रद्द करण्यात आला असून कावड मिरवणूक, पालखी मिरवणूक, छबिना मिरवणूक, मानाची काठी मिरवणूक आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून मंदिर देखील बंद करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी यात्रेच्या दिवशी गर्दी न करता घरी राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन भांडगाव ग्रामपंचायत च्यावतीने सरपंच सुनीता काशिनाथ खरमाळे, उपसरपंच सुवर्णा राजू तवले, माजी सरपंच अशोक सुखदेव खरमाळे,माजी सरपंच बबन पवार, युवा नेते विनायक राजाराम खरमाळे व ग्रामस्थांनी केले आहे.

0 Comments