पारनेर विधानसभेसाठी शिवसेनेकडून डॉ श्रीकांत पठारेंकडून मोर्चेबांधणी

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट


चंद्रकांत कदम पारनेर

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पारनेर - नगर विधासभेसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे हे उमेदवारीसाठी रिंगणात उतरले आहेत. नुकतीच त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीला पुष्टी मिळत आहे.


         राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शिवसेना (ऊबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून कंबर कसली आहे. अहमदनगर दक्षिण मध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करत निलेश लंके खासदार झालेले आहेत. त्यांच्याच पारनेर मतदार संघात महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाकडून शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभेला शिवसेना पक्षाकडून लंके यांना भरघोस मदत केली असून विधासभेला पारनेर ची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली असून डॉ श्रीकांत पठारे हे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ श्रीकांत पठारे यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती . त्यावेळी ठाकरे व पठारे यांच्यात बंद दाराआड सुमारे अर्धातास चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी पठारे यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे अनुकूल असल्याचे समजते आहे. 


        डॉ श्रीकांत पठारे यांनी कोरोना काळात तालुक्यातील हजारो रुग्णांची केलेली मोफत आरोग्य सेवा, सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून गेल्या ४,५ वर्षांत तालुकाभर सुरू असलेली वैद्यकीय सेवा, पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व अडचणीच्या काळात पक्षावर ठेवलेली निष्ठा व शिवसैनिकांना दिलेली ताकद या सर्व गोष्टींचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून त्यांच्या याच सामाजिक कामाबाबत त्यांचे तोंडभरून कौतुक यावेळी ठाकरेंनी केल्याचे समजते. गत १५ वर्षांपासून पारनेरची जागा शिवसेनेकडे होती. ती पुन्हा मिळविण्यासाठी डॉ श्रीकांत पठारे हे उमेदवार दिल्यास ते विक्रमी मतांनी निवडून येऊ शकतात अशी मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी डॉ श्रीकांत पठारे यांना मातोश्रीवर बोलावून सर्व कामांची माहिती घेऊन चर्चा केली व ते पठारे यांच्या उमेदवारीबाबत अनुकूल असल्याचे समजते. त्यादृष्टीने पठारे हे कामाला लागले असून मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

    


     

महाविकास आघाडीकडून डॉ पठारे सर्वसमावेशक चेहरा

     डॉ श्रीकांत पठारे हे विधानसभेला सामोरे गेल्यास सर्वसमावेशक व उच्चशिक्षित चेहरा म्हणून तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून येऊ शकतात. तालुक्यातील तळागाळातील जनतेत त्यांचा संपर्क असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. खासदार नीलेश लंके व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या मतदारांमुळे ही निवडणूक एकहाती डॉ श्रीकांत पठारे निवडून येऊ शकतात. 


       

तत्कालीन जागा राष्ट्रवादीची , शिवसेनेला सोडणार ?

तत्कालीन पारनेरची विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर आमदार निलेश लंके निवडून आले होते. सध्या निलेश लंके हे नगर दक्षिणेचे खासदार झाले असल्याने पारनेरची आमदारकी ची जागा रिक्त झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला सुटणार असून डॉ श्रीकांत पठारे यांना "कामाला लागा" असा आदेश मातोश्रीवरून आला आहे. पारनेर च्या जागेबाबत उध्दव ठाकरे हे शरद पवारांसोबत बोलणार असून ही जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे शिवसैनिकांमधून बोलले जात आहे.


 

उद्धव साहेबांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण - डॉ श्रीकांत पठारे

      मातोश्रीवर झालेल्या भेटीबाबत डॉ श्रीकांत पठारे यांना विचारले असता, शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन शिवसेना व डॉ श्रीकांत पठारे मित्रपरिवाराकडून सुरू असलेल्या आरोग्य शिबिर व इतर कामांवर माझे बारीक लक्ष आहे, पारनेर तालुक्यात सुंदर काम सुरू असून असेच काम सुरू ठेवा अशी शाबास्कीची थाप देत आशीर्वाद उद्धव साहेबांनी दिले आहेत. पारनेर विधानसभा उमेदवारीबाबत उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला प्रमाण असेल. मातोश्रीचा आदेश आम्हा शिवसैनिकांना सर्वोच्च असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगत विधानसभा उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला अप्रत्यक्ष सहमती दर्शविली.


Post a Comment

0 Comments