गांजिभोयरे सोसायटीचे संचालक मनोज तामखडे यांचे कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून शेतीसाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे. परंतु शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी व खतांच्या किंमती वाढवण्यासाठी दुकानदारांकडून कृत्रिम टंचाई दाखवली जात असून त्याआडून शेतकऱ्यांकडून अव्वाच्या-सव्वा पैसे वसूल केले जात आहेत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गांजिभोयरे सेवा संस्थेचे संचालक मनोज तामखडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुबलक प्रमाणात पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग केली आहे. केलेल्या पिकांना खते देण्यासाठी शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांची आवश्यकता असते. परंतु खतांच्या दुकानदारांकडून याच खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे अनेक दुकानदार चढ्या भावाने ही खते विक्री करताना दिसत आहेत. काही दुकानदार गरज नसलेल्या लिक्वीड औषधांची जबरदस्तीने या खतांसोबत विक्री करत आहेत. खतांची माहिती, आवक-जावक, रोजचे बाजारभाव दुकानाच्या बाहेर फलकावर लिहिलेली दिसत नाहीत. काही दुकानदार बफर स्टॉक च्या नावाखाली खतांचा साठा करून ठेवतात. साठा असताना देखील ते शेतकऱ्यांना खते देत नाहीत. याबाबत आपल्या कृषी विभागाकडे अनेकदा या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्यावेळी तात्पुरता स्वरूपात हा प्रश्न सुटला जातो. परंतु हा प्रश्न निर्माण होतो. यापुढे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांसमवेत आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा मनोज तामखडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

0 Comments