विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक आकाशकंदील व पणती

 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक आकाशकंदील व पणती 

स्वनिर्मित आकाशकंदील व पणती  लावून दीपोत्सवाचा संकल्प..

    


    दीपावली सण आला की बालमित्रांना वेध लागतात सुट्ट्या,आकाशकंदील आणि विविध डिझाईनच्या पणत्यांचे..!!दीपावली मध्ये आपल्या घरासमोरील आकाश कंदील व पणत्या स्वतः बनवून लावल्या तर चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणीत होईल. म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच पर्यावरणपूरक आकाशकंदील व पणती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर, विद्यालयात पर्यावरणपूरक आकाश कंदील व पणती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

    दीपावलीत आवश्यक असणाऱ्या आकाशकंदील व पणतीचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी सांगितलें.


   आकाश कंदील तयार करण्यासाठी फाईल बोर्ड पेपर,विविधरंगी कागद,कापडी लेस,टिकल्या डिंक व दोऱ्याचा वापर करीत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेत आकाशकंदील साकारले. भार्गवी शिरोळे,श्रेया औटी,समीक्षा गट,गायत्री अंबुले, आर्यन वैद्य या विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक आकाश कंदील तयार केले.

         पणती तयार करण्यासाठी पर्यावरण पूरक शाडू मातीचा वापर करत विविध पणतीचे आकार कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी दिले. पणती तयार करताना गोलाकार,मयूर,त्रिकोणी असे विविध आकार तसेच पणती वर आकर्षक अशी डिझाईन करत विद्यार्थी नवनिर्मितीमध्ये दंग झाले होते.वेदिका विश्वास, अक्षदा औटी, रिया सातपुते यांनी आकर्षक व विविध आकाराच्या पणत्या साकारल्या.


          यानिमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केले की दिवाळीत बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक आकाशकंदील व पणती पेक्षा आपल्या पाल्यांनी साकारलेला आकाश कंदील घरासमोर लावावा त्यामुळे आपल्या परिवाराचा आनंद द्विगुणीत होईल. तसेच अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आदर वाढत आहे.

       कला ,कार्यानुभव विषयाच्या विविध कार्यशाळा विद्यालयात होत असल्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो.आकाशकंदील व पणती बनविणे किती सोपे असते याचा अनुभव या कार्यशाळामुळे मिळाला- समीक्षा गट-विद्यार्थिनी

       शालेय स्तरावर अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजनामुळे विद्यार्थ्यांचे मन ताजेतवाने होत असते व त्याचा उपयोग त्यांना अभ्यासामध्ये होतो- दत्तात्रय औटी- पालक

   कार्यशाळा यशस्वीतेसाठी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे,संदीप पांढरे,सुरेखा थोरात, मनोहर रोकडे,सुरज घोडके,श्रीकांत शिंदे, प्रमोद कोल्हे आदी प्रयत्नशील होते.विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले पर्यवेक्षक बाबासाहेब चौरे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments