पारनेर प्रतिनिधी
सामाजिक कार्य करत असणाऱ्या कार्यकर्त्याची २०१८ मध्ये पारनेर पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी सराईत गुंड म्हणून पोलिसांच्या गोपनीय रेकॉर्ड वहिला नोंद करून सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला असून रेकॉर्ड वहिवरील नाव त्वरित कमी करावे अन्यथा सदर सामाजिक कार्यकर्त्याचा (पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेल्या गुंडाचा) भव्य नागरी सत्कार निघोजच्या पोलीस चौकीसमोर करून गांधीगिरी मार्गाने पोलीस प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते १ जानेवारी २०२३ ला निषेध करणार आहेत.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील जवळे येथील नर्सरीचालक व लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. पारनेर तालुक्यात अन्याय, अत्याचार, भ्रष्टचार व दारूबंदी यावर सक्रिय पणे काम करून समाजातील लोकांचा आधार म्हणून रामदास घावटे यांची पारनेर तालुक्यात ओळख आहे. पारनेर पोलीस ठाण्याची बेकायदेशीरपणे सुशोभीकरण केल्याची तक्रार केल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. ही तक्रार लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी केल्याने त्यांच्याविषयी मनात राग धरून तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी रामदास घावटे यांच्यावरील किरकोळ गुन्हे असताना देखील त्यांची सराईत गुंड म्हणून पोलिसांच्या गोपनीय नोंद वहीत नोंद केली. रामदास घावटे यांचेविषयी नाशिक येथे न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात ही कागदपत्रे तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडून न्यायालयात सादर केलेली असून नुकतीच ती घावटे यांना दिसून आले.
सामाजिक कामे करत असताना अनेक काळे धंदे करणारे व त्यांना पाठबळ देणारे यांची मने दुखावली जातात आणि त्यातून सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे सामाजिक कार्यकर्त्यांना काही नविन नाही. परंतु समाजात निष्ठेने व सत्याने वागणाऱ्यांना असाच त्रास होत राहिला तर समाजात होणाऱ्या अन्याय, भ्रष्टाचार विरोधात बोलायला कोणीच समोर येणार नाही. आज सामाजिक कार्यकर्त्यांची परिस्थिती म्हणजे "काही जण जात्यात तर काही जण सुपात आहेत" त्यामुळे वेळीच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत चुकीच्या पद्धतीने सामाजिक कामे करणाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याविषयी आवाज उठविणे गरजेचे आहे.
रामदास घावटे यांची सराईत गुंड म्हणून नोंद असलेल्या वहितुन नाव कमी करावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघोज पोलीस ठाण्याच्या समोर गांधीगिरी पद्धतीने पोलीस ज्यांना गुंड म्हणवत आहेत अशा सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे. पोलीस प्रशासनाने घावटे यांचे सराईत गुंड रेकॉर्ड वहिमधील नाव ३१ डिसेंबर पर्यंत कमी करावे अन्यथा १ जानेवारी रोजी निघोज पोलीस ठाण्यासमोर गांधीगिरी आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी दिला आहे.


0 Comments