पिंपरी जलसेनमध्ये ढगफुटी ; सर्वत्र पाणीबाणी

 



ठेकेदाराने बनवला नाही पूल ; नागरिकांची घरे गेली पाण्याखाली, जनावरे रात्रभर पाण्यात

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे नवीन रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावर ठेकेदाराने पूल न बनवल्याने गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मोठा तलाव साचला होता. त्यामुळे बोरूडे वस्तीवरील नागरिकांच्या घरात पाणी जाऊन जनावरे रात्रभर पाण्याखाली गेली होती. 


      गुरुवारी रात्री २ वाजता झालेल्या अवकाळी ढगफुटी सदृष्य पावसाने पिंपरी जलसेन व परिसरात हाहाकार घातला. विजांच्या कडकडाटासह सुमारे ३ तास चाललेल्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना नदीचे साम्राज्य प्राप्त झाले होते.तर इतर सर्वत्र पाणी पाणी झाले होते. गावातील अनेकांच्या घरांमध्ये, शाळेमध्ये पावसाचे पाणी गेले होते. सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. गावातील मुख्य रस्त्यावरील बंधाऱ्यावरून पूर्ण क्षमतेने पाणी वाहिले असून रस्त्यावरील असणाऱ्या पुलावरून देखील पाणी वाहत असल्याने काही काळ पिंपरी जलसेन मधील वाहतूक देखील थांबविण्यात आली होती.

         सध्या पिंपरी जलसेन(पांढरी) ते पिंपरी फाटा(टेकडी) या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर सध्या खडी व मुरुमीकरण करण्यात आला असून उर्वरित काम चालू स्थितीत आहे. परंतु या रस्त्यावर बोरूडे मळ्यानजीक ठेकेदाराने पूल न बनवल्याने गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने दगडू बोरूडे व भानुदास बोरूडे यांच्या घराजवळ रस्त्याला पूल नसल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता अडुन राहिल्याने पाण्याचा मोठा तलाव साचला आहे. त्यामुळे शेजारी राहत असलेल्या भानुदास बोरूडे यांच्यासह शेजारील नागरिकांच्या घरात व गोठ्यात पाणी गेले . त्यामुळे नागरिकांसह जनावरांना देखील  पावसाच्या पाण्यात रात्रभर काढावी लागली त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे व नागरिकांचे झाले आहे. सदर रस्त्यावर जर पूल असता तर तेथील पावसाचे सर्व पाणी वाहून गेले असते व नागरिकांचे नुकसान टळले असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन सदर ठिकाणी पूल बनवण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. त्याचबरोबर महसूल प्रशासनाकडून गावातील सर्व शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासन पातळीवरून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.


     ......तर नुकसान टळले असते

या रस्त्याचे काम चालू असताना त्याचवेळी ठेकेदाराने येथे पूल बनवला असता तर पावसाचे पाणी सर्व वाहून गेले असते व आमचे नुकसान झाले नसते. पूल बनवण्यासाठी येथे पुलाचे पाईप देखील आणलेले आहेत. आता पुढील हानी टाळण्यासाठी ठेकेदाराने तातडीने येथे पूल बनवून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक सागर बोरूडे यांनी केली आहे.



मळ्यातील नागरिकांचा संपर्क तुटला....

 मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी ओढ्यांवर असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने अनेक ठिकाणी पूल देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments