वीजबिल थकविल्याने पिंपरी जलसेन, सांगवी सूर्या ग्रामपंचयातचा वीजपुरवठा खंडित
महावितरणाची धडक कारवाई
अनेक गावांचा पाणीपुरवठा वीज पुरवठा खंडित
पारनेर प्रतिनिधी
ग्रामपंचायत कार्यालयाची विज बिल थकबाकी न भरल्याने पिंपरी जलसेन व सांगवी सूर्या ग्रामपंचायत वीजपुरवठा महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. महावितरणकडून धडक कारवाई करण्यात येत असून अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याची वीज देखील थकबाकीमुळे खंडित करण्यात आली आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कडून पथदिवे, पाणी पुरवठा, व ग्रामपंचायत कार्यालय वीजबिल थकबाकी ठेवण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार पथदिवे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा व ग्रामपंचायत कार्यालय आदी विजबिले १५ व्या वित्त अयोगातून भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. तरी देखील ज्या ग्रामपंचायतींनी ही विजबिले थकीत ठेवली आहेत त्यांच्यावर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वडझिरे महावितरण विभागाचे सहाय्यक उपअभियंता गौरव चरडे यांनी दिली. त्यानुसार पिंपरी जलसेन व सांगवी सूर्या येथील ग्रामपंचायत कार्यालयाची व कळस , पाडळी आळे, गारखिंडी, गांजिभोयरे या गावांची पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात आली असून ज्या ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले त्यांची पुन्हा विजजोडणी करण्यात आली असल्याचे उपअभियंता गौरव चरडे यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनता व प्रशासकीय कार्यालये सर्वांना नियम सारखे आहे. वीजबिल थकीत न ठेवता आपले विजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने सहाय्यक उपअभियंता गौरव चरडे यांनी केले आहे.

0 Comments