जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सर्वोतोपरी मदत करणार - ऍड उदय शेळके

 पिंपरी जलसेन येथे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड उदय शेळके यांचा नागरी सत्कार

चंद्रकांत कदम ( पिंपरी जलसेन)

अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने टाकलेला विश्वास व जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा बँकेचे बिनविरोध अध्यक्षपद मिळाले असून पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करणार असून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवणार असल्याचे मत अहमदनगर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. उदय गुलाबराव शेळके यांनी व्यक्त केले.

पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड उदयदादा शेळके यांचा सत्कार करताना सरपंच सुरेश काळे.

      अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. उदय शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शेळके बोलत होते. ऍड. शेळके बोलताना म्हणाले की, कै. सॉ. गुलाबराव शेळके साहेबांच्या प्रेरणेतून व आशीर्वादातून मला सहकार क्षेत्रात काम करण्यास प्रेरणा मिळत आहे. पारनेर तालुक्याला पहिल्यांदा जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी उपाध्यक्ष व संचालक असताना जनतेची अनेक कामे मार्गी लावली आहेत. अध्यक्षपदाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देऊन शेतकऱ्यांना व जनतेला विकासाच्या योजना मिळवून देणार आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविणार आहे. असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी व्यक्त केले.

      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे होते. व्यासपीठावर पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा गीतांजली ताई शेळके, गांजीभोयरे चे माजी सरपंच डॉ आबासाहेब खोडदे, डॉ वर्षा खोडदे, डॉ स्वप्नील भालेकर, डॉ. सोनल भालेकर, खनकर आदींसह वडझिरे, जवळे, म्हस्केवाडी व परिसरातील अनेक सरपंच उपसरपंच व पिंपरी जलसेन मधील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच लहू थोरात यांनी केले तर आभार माजी सरपंच भास्कर शेळके व तुकाराम कदम यांनी मानले.

अध्यक्षपदासाठी इलेक्शन नसून ते सिलेक्शन होते.

माझा जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षपदाच्या कामाचा अनुभव पाहून जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून अध्यक्षपदाची माळ बिनविरोध माझ्या गळ्यात टाकली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अध्यक्षपदाची झालेली निवडणूक ही इलेक्शन नसून ते फक्त सिलेक्शन होते. अध्यक्षपदाच्या घोषणेची फक्त औपचारिकता यावेळी पार पडली अशी मिश्किल टिपण्णी ऍड उदय शेळके यांनी केली.

गीतांजलीताई शेळके यांचा सन्मान करताना पिंपरी जलसेन ग्रामपंचायत महिला सदस्या मीनाक्षी थोरात, सीताबाई कदम, दीपाली वाढवणे. 


गीतांजली शेळके यांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी जलसेन येथील महिलांचे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून गावातील महिलांबद्दल आदरभाव व्यक्त केल्याबद्दल ऍड उदय शेळके यांच्या पत्नी व पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा गीतांजली शेळके यांचा पिंपरी जलसेन ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments