12 एकर क्षेत्रावरील जनावरांचा चारा जळून खाक ; तरुणांच्या सतर्कतेने आग विझवली
कोणीतरी मुद्दाम खोड केली असल्याचा संशय
पारनेर
विजयी उमेदवाराच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेला जनावरांच्या चाऱ्याचा डोंगर अज्ञाताने पेटवून दिल्याने जवळपास 12 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाले. तरुणांच्या सतर्कतेने आग विझवल्याने पुढील अनर्थ होण्यापासून टळला.
पिंपरी जलसेन येथील अरुण बाबुराव कदम यांच्या स्वमालकीच्या गट नं 863 मधील डोंगरावर मंगळवारी सकाळी 10 च्या दरम्यान कोणीतरी आग लावली. आग लागली असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अरुण कदम यांना माहिती दिली. परंतु काही कामानिमित्त कदम हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी गावातील इतर तरुणांना आग लागली असल्याची माहिती दिली. गावातील तरुण सचिन कदम यांनी त्यांच्या 25 ते 30 साथीदारांना सोबत घेऊन तातडीने आग लागलेल्या डोंगराकडे जाऊन आज विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. वाळलेले गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्याठिकाणी पाण्याची सोय नसल्याने तरुणांनी झाडाचा पाला व मातीच्या साहाय्याने कशीबशी आग विझवली. त्यात अरुण कदम यांचे गट नं 863 मधील 10 एकर व शेजारील 2,3 एकर अशे 12,13 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाले. गवत जळून गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
आग विझवण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुरेश काळे, सचिन काळे, सचिन कदम, गजानन कदम, नारायण थोरात, रमाकांत कदम, ताराचंद बोरुडे, किरण वाढवणे, लखन थोरात, गोविंद घेमुड, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पानमंद, हरीश वाढवणे, विश्वनाथ कदम, अक्षय कदम, संतोष बोरुडे यांच्यासह 25 ते 30 जणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात अरुण कदम यांच्या पत्नी सीताबाई कदम या विजयी झाल्या आहेत. एकीकडे कालचा जल्लोष अजून सुरू होता तोच असे झाल्याने कुणीतरी खोड करून निवडणुकीचा राग म्हणून मुद्दाम डोंगर पेटवून दिला असल्याचा संशय अरुण कदम व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.


0 Comments