पुणे : शिरूरमध्ये धोका आणखी वाढला, `त्या` दोघांचे कोरोना रिपोर्ट...

रोख ठोक न्यूज तळेगाव ढमढेरे (पुणे) : 
        तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील काल मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या दोन्ही मुलांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे व कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तलाठी डी. एस. भराटे यांनी सांगितली.
        तळेगाव ढमढेरे येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा काल औंध येथील हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त मृत महिलेची दोन्ही मुले औंध येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी दिले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, मृत कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील नातेवाईक, तिच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्‍टर व त्यांचे कर्मचारी यांच्या घशातील द्रवाचा नमुना आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे काल पाठविला असून त्यांच्या कोरोना रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य विभागाने कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावात पुन्हा सर्व्हे करण्यास सुरुवात केली असून, मृत महिलेच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन तलाठी भराटे यांनी नागरिकांना केले आहे.


दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथे शुक्रवारी एक व शनिवारी दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आणि त्यातील एका महिलेचा कालच मृत्यू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तळेगाव ढमढेरे परिसर शासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे, पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, गावातील सर्व रस्ते बंद केले आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्स व संचार बंदी पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भराटे यांनी केले आहे.
शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे कोरोनामुळे आतापर्यंत एक पुरुष व एक महिलेचा मृत्यू झाल्याने तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घाबरून न जाता घरातच बसून, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments