हस्तकलेच्या जादुला सातासमुद्रापार मागणी ; पारनेरच्या अवलिया कलाशिक्षकाची अफलातून चित्ररेखाटन

 कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांच्या हस्तकलेला परदेशातून मागणी


रोख ठोक न्यूज (चंद्रकांत कदम)

      पारनेर तालुक्यातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवङे या अवलिया कलाशिक्षकाच्या कलाकृतीने सध्या सर्वांना मोहिनी घातली आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर येथील महाविद्यालयात कलाशिक्षक असणारे ज्ञानेश्वर कवङे यांनी तीन वर्षांपुर्वी अक्षरगणेश कलाकृतीचा श्रीगणेशा केला. प्रारंभी एक छंद म्हणून जोपासलेल्या या कलेचा आता मोठा विस्तार वाढला आहे. 

व्यक्तीच्या नावात अक्षरगणेश रेखाटन करून त्या व्यक्तीला ती कलाकृती वाढदिवसाला भेट देऊन त्यांचा वाढदिवस द्विगुणित करण्यासाठी वाढदिवसाची अनोखी भेट ते देत असे. नगर जिल्हासह राज्यातील नामवंत राजकारणी,प्रसिद्ध खेळाडू, शिक्षक, मित्र, समाजसेवक आदीच्या नावात अक्षरगणेश कलाकृती रेखाटुन भेट दिली आहे.
      सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग संकटात आहे. सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा. सर्वांनी हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर ठेवा. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, घराबाहेर जायचे असल्यास मास्क लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी देखील आपल्या पोस्टर चित्रणाद्वरे नागरिकांना कोरोना वरील उपाययोजना करण्याचे व प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नावाप्रमाणेच चित्रकलेतील ज्ञानेश्वर म्हणविले जाणारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांना त्यांच्या शैक्षणिक कला क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी मुळे धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी धुळे व डोम्स आर्ट मटेरियल मुंबई च्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या पाश्र्वभूमीवर नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार धुळे शहराचे माजी आमदार तथा धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब कदमबांडे व ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम व डोम्स आर्ट मटेरियल प्रा.लि. मुंबईचे विशेष सल्लागार रघूनाथ पोवळे, धुळे  जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राहूल पाटील यांच्या उपस्थितीत प्रा.आर.ओ. निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(पॉलिटेक्निक) कॉलेज गोंदूर, धुळे येथे  कवडे यांना प्रदान करण्यात आला.

सध्याच्या इंटरनेटच्या युगात गणेशोत्सव काळात व्हाटसप,फेसबुक व सोशल मीडियावर आपल्या नावातील अक्षरगणेश वॉलपेपर, प्रोफाईलवर ही कलाकृती ठेवण्यावर अनेकांचा कल वाढला आहे.त्यातून नगर जिल्ह्य़ासह राज्यभरातून व परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयाकङून इंटरनेटवर ही कलाकृती तयार करून देण्याची मागणी वाढली असल्याचे कवङे यांनी सांगितले. तसेच एक छंद म्हणून जोपासलेली ही कला आता व्यवसायिक रूप धारण करत असल्याने यातून दोन पैशाची कमाई मिळत आहे.आहे.

यंदाच्या गणेशोत्सव काळात या अक्षरगणेश कलाकृतीला मोठी मागणी असल्याने सुमारे हजार कलाकृती तयार केल्या असून अजूनही मागणी वाढत आहे. मात्र आता परदेशातूनही मागणी होत असल्याने मला मोठे समाधान लाभले आहे असेही कवङे यांनी सांगितले.

वङील हेच माझे गुरु!

रयत शिक्षण संस्थेत माजी शिक्षक असणाऱ्या रामदास कवङे या माझ्या वडिलांनी मला बालपणापासून हस्ताक्षराचे बाळकडू दिले. त्यामुळे क्षणार्धात अक्षरातून गणेशाची कलाकृती रेखाटन करण्याची कला मी शिकलो. अन् आज ही कला व्यवसायिक रूप घेत असुन  माझे वङील हेच माझे गुरु असल्याचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवङे हे अभिमानाने सांगतात.


फलकलेखनही उत्कृष्ट
        कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे हे पारनेर तालुक्यातील विविध शाळांमध्ये साजरी होणाऱ्या प्रत्येक उत्सव व कार्यक्रमांचे शाळेतील फलकावर देखील उत्कृष्ट बोलके चित्रलेखन करतात. त्यांच्या या कौशल्याबद्दल त्यांचे पारनेर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments