वादळी अवकाळी पावसामुळे पिंपरी जलसेन परिसरात मोठे नुकसान
पिंपरी जलसेन परिसरात आज झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. थोरात मळा येथे भगवंता गंगाराम थोरात यांच्या घरावर मोठे बाभळीचे झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र घरावरील पत्रे, लाकडी साहित्य तसेच घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर थोरात मळ्यातील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने घरातील उर्वरित सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
दरम्यान, थोरात मळा परिसरातच जिजाराम थोरात यांच्या घराजवळ रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळल्याने चिंचोली - पिंपरी जलसेन मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला. अचानक रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली तसेच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत रस्त्यावरील झाड आणि फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे.


0 Comments