हभप. गुरुमाऊली तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना राजस्थान-उत्तरप्रदेश-बिहारमधील पवित्र स्थळांचे दर्शन
पारनेर प्रतिनिधी - चंद्रकांत कदम
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील सिद्ध गोरक्षनाथ मंदिर व "आदेश" परिवार यांच्या वतीने आयोजित राजस्थान, उत्तरप्रदेश व बिहार राज्यांतील पवित्र तीर्थक्षेत्रांची १२ दिवसांची धार्मिक यात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडली. या यात्रेला हभप. गुरुमाऊली तात्या महाराज काटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यात्रेमध्ये अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील सुमारे ९७ अबालवृद्ध भाविक सहभागी झाले होते. सर्व भाविकांनी अत्यंत उत्साहाने व भक्तिभावाने या तीर्थयात्रेत सहभाग नोंदविला.
यात्रेदरम्यान राजस्थानमधील खाटू श्याम मंदिर, सालसर बालाजी मंदिर, जीन माता मंदिर तसेच पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर येथे भाविकांनी दर्शन घेतले.
यानंतर उत्तरप्रदेशमधील श्रीराम जन्मभूमी मंदिर (अयोध्या), गोरखनाथ मंदिर (गोरखपूर), त्रिवेणी संगम (प्रयागराज) तसेच काशी नगरीतील काशी विश्वनाथ मंदिर येथे भाविकांनी दर्शन घेऊन पूजाविधी केले.
यात्रेच्या अंतिम टप्प्यात बिहार राज्यातील गया येथील विष्णुपद मंदिर येथे भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन पितृ तर्पण व धार्मिक विधी करण्यात आले.
यात्रेदरम्यान भजन-कीर्तन, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. सर्व भाविकांनी ही यात्रा अत्यंत समाधानकारक व अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली.
“आम्ही सिद्ध गोरक्षनाथ मंदिर व सर्व नाथ सेवकांच्या सहयोगाने दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये देवदर्शनासाठी तीर्थयात्रा आयोजित करत असतो. यावर्षी राजस्थान, उत्तरप्रदेश व बिहारमधील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाण्याचा योग आला. या यात्रेत ९७ अबालवृद्ध भाविक सहभागी झाले होते. सर्वांच्या सहकार्याने व सिद्ध गोरक्षनाथांच्या कृपेने आमची तीर्थयात्रा आनंदात पार पडली.”
— हभप. तात्या महाराज काटकर



0 Comments