तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय देवदर्शन यात्रा पार

 तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय देवदर्शन यात्रा पार

महाराष्ट्र, गुजरात राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहारमधील पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन; ९७ भाविकांचा सहभाग

चंद्रकांत कदम | पारनेर

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील सिद्ध गोरक्षनाथ मंदिर यांच्या वतीने महाराष्ट्रासह,  राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यांतील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांच्या देवदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेली १२ दिवसांची धार्मिक तीर्थयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. या यात्रेला हभप. गुरुमाऊली तात्या महाराज काटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सिद्ध गोरक्षनाथ मंदिर, देऊळगाव गलांडे यांच्या वतीने आयोजित तीर्थयात्रेदरम्यान विविध पवित्र स्थळांचे दर्शन घेताना भाविक.

या यात्रेमध्ये अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील सुमारे ९७ अबालवृद्ध भाविकांनी सहभाग घेतला होता. यात्रेदरम्यान सर्व भाविकांनी भक्तिभावाने देवदर्शन घेत भजन-कीर्तन, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.

यात्रेची सुरुवात राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर, सालसर बालाजी मंदिर आणि जीन माता मंदिर या पवित्र स्थळांच्या दर्शनाने झाली. त्यानंतर पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर येथे ब्रह्मदेवाचे दर्शन घेऊन भाविकांनी पुष्कर सरोवराचे दर्शन घेतले. या पवित्र स्थळांवरील धार्मिक वातावरणामुळे सर्व भाविक भावविभोर झाले. यानंतर यात्रेचा पुढील टप्पा उत्तरप्रदेश राज्यात पार पडला. येथे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर, गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर, तसेच प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान व पूजाविधी करण्यात आले. पुढे काशी नगरीतील काशी विश्वनाथ मंदिर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान विश्वनाथांचे दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना मिळाला. काशीतील घाट, गंगा आरती व धार्मिक वातावरणामुळे यात्रेतील भाविक अत्यंत भारावून गेले.

यात्रेदरम्यान मध्यप्रदेशातील काही पवित्र स्थळांचेही दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना मिळाला. त्या ठिकाणीही भाविकांनी भक्तिभावाने देवदर्शन घेत प्रार्थना केल्या.

यात्रेच्या अंतिम टप्प्यात बिहार राज्यातील पवित्र गया येथील विष्णुपद मंदिर येथे भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन भाविकांनी पितृ तर्पण व धार्मिक विधी केले. पूर्वजांच्या स्मरणार्थ केलेल्या या विधींमुळे यात्रेचा समारोप अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाला.

यात्रेदरम्यान दररोज भजन-कीर्तन, हरिनाम संकीर्तन, प्रवचन व सामूहिक प्रार्थना यांमुळे वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. हभप. तात्या महाराज काटकर यांनी भाविकांना अध्यात्म, संस्कार व भक्तीचे महत्त्व पटवून देत सतत मार्गदर्शन केले.

सर्व भाविकांच्या सहकार्यामुळे व सिद्ध गोरक्षनाथांच्या कृपेने ही तीर्थयात्रा अत्यंत आनंदात व निर्विघ्नपणे पार पडली. यात्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.


“आम्ही सिद्ध गोरक्षनाथ मंदिर व सर्व नाथ सेवकांच्या सहयोगाने दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये देवदर्शनासाठी तीर्थयात्रा आयोजित करत असतो. यावर्षी राजस्थान, उत्तरप्रदेश व बिहारमधील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाण्याचा योग आला. या यात्रेत ९७ अबालवृद्ध भाविक सहभागी झाले होते. हिंदू धर्माच्या धार्मिक स्थळांचे दर्शनाने एक वेगळी ऊर्जा प्राप्त असते.  सर्वांच्या सहकार्याने व सिद्ध गोरक्षनाथांच्या कृपेने आमची तीर्थयात्रा आनंदात पार पडली.” — तात्या महाराज काटकर



Post a Comment

0 Comments