"युवा शाहीर" पुरस्काराने शाहीर बाळासाहेब बोरुडे यांचा सन्मान

खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित 

┗━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┛

पारनेर प्रतिनिधी - चंद्रकांत कदम –

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील अध्यात्मातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध शाहीर बाळासाहेब बोरुडे यांना ‘युवा शाहीर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी युवा नेते दीपक अण्णा लंके यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

छायाचित्र : खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते युवा शाहीर पुरस्कार स्वीकारताना शाहीर बाळासाहेब बोरुडे. छाया - चंद्रकांत कदम





सध्याच्या भौतिक व इंटरनेटच्या युगात मानवाने जग जवळ आणले असले तरी आपली संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म जपणे गरजेचे आहे. किर्तन, प्रवचन, सत्संग यांसारख्या माध्यमांतून समाजामध्ये अध्यात्मिक प्रबोधन करण्याचे कार्य सुरू आहे. याच परंपरेतून शाहीर बाळासाहेब बोरुडे हे भेदिकाच्या माध्यमातून समाजात आध्यात्मिक व धार्मिक प्रबोधन करत आहेत.

आपल्या दमदार शाहिरी आवाजात भेदिक, भजन आणि प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात ते अव्वल मानले जातात. पारनेर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात त्यांच्या भेदिकांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. संत एकनाथ महाराज यांच्या भारूड परंपरेप्रमाणे भेदिकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

पिंपरी जलसेन येथील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. त्यांच्या भेदिकांच्या कार्यक्रमाची दखल घेत आकाशवाणी च्या पुणे केंद्राने त्यांना कार्यक्रम करण्याची संधी दिली असून याबाबत आकाशवाणीशी त्यांचा करारही करण्यात आला आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सप्ताह, यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भेदिकांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. समाजप्रबोधनाला प्राधान्य देत लोककला आणि अध्यात्म जपण्याचे कार्य करणाऱ्या शाहीर बाळासाहेब बोरुडे यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांच्या या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.


देवावर असलेली श्रद्धा व शाहिरी लोककलेला जनतेने दिलेला प्रतिसाद यामुळे माझ्यासारखा ८ वी शिकलेला सामान्य घरातील कलाकार आज "आकाशवाणी" पर्यंत पोहोचला आहे. आजपर्यंतच्या प्रवासात खूप अडचणींवर मात करत इथपर्यंत पोहोचलो आहे. या कामाची पावती म्हणून खासदार नीलेश लंके साहेबांनी "युवा शाहीर" पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मला ऊर्जा देणारा असून यापुढील काळात शाहिरी भेदिकांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम करणार आहोत.
शाहीर बाळासाहेब बोरुडे (युवा शाहीर पुरस्कार प्राप्त)


Post a Comment

0 Comments