शिक्षण विशेष बातमी
पारनेर प्रतिनिधी (चंद्रकांत कदम)
राज्यातील काही शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्यानंतर लगेच उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी करू देत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. काही ठिकाणी दुपारनंतर, शाळा सुटल्यानंतर किंवा मुख्याध्यापकांच्या सोयीप्रमाणेच उपस्थिती रजिस्टर उपलब्ध करून दिले जात होते.
या गंभीर बाबीची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अनिल महादेवराव शिवणकर यांनी शिक्षण संचालक महेश पालकर यांना निवेदन देऊन हा विषय निदर्शनास आणून दिला.
![]() |
| अनिल महादेवराव शिवणकर सर (अध्यक्ष )भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ |
या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, शाळेत कर्मचारी उपस्थित झाल्याबरोबरच त्यांना उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी करण्याची परवानगी द्यावी.
नियमांनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत आल्यानंतर शालेय कामकाज सुरू होण्यापूर्वी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. मात्र काही ठिकाणी मुख्याध्यापक मनमानी करत संबंधित शिक्षकांना लगेच स्वाक्षरी करू देत नव्हते. ही बाब गंभीर व नियमबाह्य असल्याचे शिवणकर यांनी नमूद केले होते.
शालेय परिसरात एखादी अनुचित घटना घडल्यास कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद नसेल तर ते शाळेत उपस्थित नव्हते असे तांत्रिकदृष्ट्या समजले जाऊ शकते आणि त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना कर्मचारी उपस्थित झाल्यानंतर त्वरित स्वाक्षरी घेण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक शिक्षकांनी शिक्षण संचालक तसेच भाजप शिक्षक आघाडीचे आभार मानले आहेत.
"शाळेत उपस्थित झाल्याबरोबर कर्मचारी उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी करणे हा शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. मात्र अनेक शाळांमध्ये कर्मचारी उपस्थिती रजिस्टर उपलब्ध करून देण्याबाबत मनमानी केली जात होती. माननीय शिक्षण संचालक यांच्या आदेशामुळे या मनमानी कारभारावर अंकुश लावला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष माननीय अनिल शिवणकर सर यांचे हार्दिक अभिनंदन.
राजू भीमभाऊ पानमंद सर (जिल्हाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी, उत्तर पुणे जिल्हा)



0 Comments