पिंपरी जलसेन शाळेत ‘वाचाल तर वाचाल’चा निनाद;

  सीईओ आनंद भंडारी यांची उपस्थिती

पारनेर :

शांतीलाल फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व युनिक फीचर्स यांच्या माध्यमातून तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या पासवर्ड वाचन उपक्रमाचा तिसरा टप्पा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरी जलसेन येथे उत्साहात पार पडला.

पिंपरी जलसेन येथे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पासवर्ड वाचन उपक्रमाबद्दल कौतुक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपस्थित मान्यवर. (छाया - चंद्रकांत कदम)

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उद्योजक राजेंद्र शिंदे (सीईओ – PAL Software), शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, वित्त अधिकारी कासार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, पासवर्ड उपक्रमाच्या जोगळेकर मॅडम व वैद्य मॅडम, गटशिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार, विस्तार अधिकारी राधाकिसन शिंदे, गारुडकर साहेब, व्होरा मॅडम, देवराम पिंपरकर, केंद्रप्रमुख बाचकर, ग्रामसेवक फुलसौंदर मॅडम तसेच पिंपरी जलसेनचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी जलसेन शाळेने वाचन अभियानात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सीईओ आनंद भंडारी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पासवर्ड त्रैमासिकावर आधारित नाटिकेद्वारे “वाचाल तर वाचाल” हा संदेश दिला. तसेच शाळेतील छोटे पण देखणे ग्रंथालय, विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन, त्यावर केलेले सारांश लेखन व अभिप्राय पाहून भंडारी यांनी समाधान व्यक्त करत “नगर जिल्ह्यात वाचन क्रांती घडेल,” असा विश्वास व्यक्त केला.

उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी शाळेचे काम पाहून प्रभावित होऊन शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा व उपकरणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे २० ते २५ गावांमधील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असून पुढील शैक्षणिक वर्षासाठी १०० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचे पाहून मान्यवरांनी शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले.

यावेळी इस्रो सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पासवर्ड मासिकाच्या मागील अंकावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या अस्मि संदीप लंके (इयत्ता ५ वी) व स्वरा ज्ञानेश्वर रसाळ (इयत्ता ७ वी) या विद्यार्थिनींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पासवर्डचे पुढील त्रैमासिक वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक पवार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments