पारनेरची महिला एसटी महामंडळात चालक, वाहक


 चंद्रकांत कदम पारनेर

      महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सर्वच घटकांत आघाडीवर असतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या याच महिला आता पुरुषांच्या एक पाऊल पुढे जाऊन समाजात काम करताना दिसत आहेत. अशीच एक पारनेरची लेक श्रीमती रेश्मा राजाराम ठुबे या सध्या पुणे येथे एसटी महामंडळात सेवेत रुजू झाल्या असून त्या चालक कम वाहकाचे कर्तव्य बजावत आहेत. पारनेरच्या महिला ड्रायव्हींग क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांच्या या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

         पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार च्या श्रीमती रेश्मा राजाराम ठुबे या एसटी महामंडळाच्या २०१९ मध्ये झालेल्या भरतीमध्ये चालक कम वाहक म्हणून नियुक्त झाल्या. त्यांनी ऑगस्ट २०२१ ते ऑगस्ट २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत पहिल्या टप्प्यातील ट्रेनिंग पूर्ण केले. सध्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रेनिंग सुरू असून मार्च महिण्याखेर ते पुणे जिल्ह्यात एसटी महामंडळात चालक कम वाहक पदावर प्रत्यक्षात कामास सुरुवात करणार आहे. रेश्मा ठुबे यांचे वडील राजाराम नाथु ठुबे हे पारनेर येथे एसटी डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून कामास होते. महामंडळामध्ये ३६  वर्षांची सेवा केल्यानंतर २०१५ मध्ये ते निवृत्त झाले व २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले.  आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नसून मुलींनी एसटी महामंडळात नोकरी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची मुलगी श्रीमती रेश्मा राजाराम ठुबे यांनी २०१९ च्या भरतीमध्ये एसटी महामंडळात नोकरी मिळवली. रेश्मा ठुबे यांना भाऊ नसून २ बहिणी व आई आहेत. आई टेलरकाम करत असून एक बहीण स्मिता कारखीले या शिक्षिका असून सुप्रिया ठुबे या एक बहीण आहेत. चालक काम करणे हे सध्या जोखमीचे काम असून रेश्मा ठुबे या चालक कम वाहकाचे काम करत असल्याने पारनेर तालुक्याला त्यांच्या या कामाचे कौतुक व अभिमान आहे.महिलांच्या अश्या या धाडसी कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होणे गरजेचे आहे.


एसटी महामंडळात काम करण्याची मला लहानपणापासून आवड व इच्छा होती. तसेच वडिलांचे स्वप्न होते की, माझ्या मुली या मुलांप्रमाणे सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्या पाहिजेत. माझी मुलगी हीच माझा मुलगा असल्याचे ते नेहमी म्हणायचे याच जिद्द व चिकाटीवर मी एसटी महामंडळात भरती झाले. त्याचप्रमाणे महामंडळाने मला व माझ्यासाहित आणखी महिलांना काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रशासनाची आभारी आहे. एसटी महामंडळाची नोकरी शेवटपर्यंत करत राहणार.

श्रीमती रेश्मा राजाराम ठुबे (चालक कम वाहक)

Post a Comment

0 Comments