पारनेर प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर निघालेल्या लाखो शेतकऱ्यांना, दिल्ली जवळील महामार्गांवर अन्यायकारक पद्धतीनं अडवले आणि जणू शत्रू राष्ट्राच्या सैन्याशी सामना करावा त्यापेक्षाही क्रूर पद्धतीने आपले सरकार आपल्याच देशातील अन्नदात्याशी वागत असल्याच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, पुण्यातील विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 'सोशल मिडीया फाउंडेशनच्या' वतीने रविवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता, पुण्यातील बालगंधर्व चौकात शेतकरी सन्मान सभा आयोजित केली आहे.
शेतक-यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मागील दोन महिन्याहून अधिक काळ आंदोलन करणा-यांना खलिस्तानी, देशद्रोही, नक्सलवादी, अराजकवादी ठरवून, सरकार व त्यांचे समर्थक बळीराजाचा वारंवार अपमान करत असून, आजवर २००हून अधिक शेतकरी प्राणास मुकले आहेत. शेतकर्यांशी चर्चा करण्याच्या बहाण्यानं केंद्र सरकार वेळकाढूपणा करत आंदोलकांत फूट पाढायचा प्रयत्न करत असून, प्रसंगी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचेही प्रयत्न सरकार करत आहे. या अन्यायामुळे व्यथित होऊन, महाराष्ट्रातील कृषक समाजाशी बांधिलकी मानणा-या भाजप वगळून सर्व पक्षातील आणि संघटनेतील युवकयुवतींनी एकत्र येऊन सरकार विरोधात शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करून, लोकजागृती करण्याच्या हेतूनं आणि विविध मागण्या मांडण्यासाठी, वरील सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याचे तीन काळे कायदे पूर्णपणे रद्द करून, नव्याने या कायद्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे, त्यानंतर नवीन विधेयकांचा मसुदा चर्चा व दुरूस्तीसाठी या कायद्यांचा मसूदा संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवला पाहिजे, तसेच शेतकरी संघटना व कृषी अभ्यासकांशीही चर्चा केली पाहिजे, इत्यादी मागण्या ‘शेतकरी सन्मान सभे’च्या निमित्ताने मांडण्यासाठीच्या या आंदोलनात, नागरिकांनी रविवार, दि. १४ फेब्रुवारीला सकाळी १० वा. बालगंधर्व चौकात सहभागी व्हावे, असे शर्मिला येवले,शंभूराजे ढवळे,हनुमंत पवार,पैगंबर शेख,अनुप देशमुख,आशुतोष शिपलकर यांच्यासह आयोजकांनी आवाहन केले आहे.

0 Comments