पिंपरी जलसेनमधील ते धोकादायक वळण ठरतेय जीवघेणे

 

स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका ; प्रशासनाने तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी

पारनेर :- प्रतिनिधी

पिंपरी जलसेन - निघोज रोडवरील पिंपरी मधील खंडोबा मंदिराजवळ असणारे धोकादायक वळण वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. धोकादायक वळणाचा अंदाज येत नसल्याने वाहने थेट स्थानिक नागरिकांच्या घरात घुसत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

पिंपरी जलसेन निघोज रस्त्यावरील पिंपरी येथील धोकादायक वळण. 

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चिंचोली फाटा ते निघोज या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपूर्वी झाले आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्यावर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गतिरोधक टाकण्याचे विसरले. तेव्हापासून या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. पिंपरी जलसेन मधील खंडोबा मदिरजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर यापूर्वी तीन वेळा अपघात झाला आहे. या अपघातात बालंबाल अनेकजण बचावले आहेत. शनिवारी पहाटे याच ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाला वळणाचा अंदाज ना आल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. रस्त्याच्या खाली दगडाला व झाडाला गाडी अडकल्याने ती तिथेच थांबल्याने स्थानिक नागरिकाच्या घरात गाडी जाता जाता बचावली व पुढील अनर्थ टळला. यापूर्वी देखील एक भरधाव वेगाने आलेली गाडी याच ठिकाणी घुसली होती. त्यावेळी देखील बालंबाल बचावली होती व  अनर्थ टळला होता. खंडोबा मंदिराजवळील हे वळण खूप धोकादायक असून गाडी रस्त्याच्या बाजूला गेल्यास थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तेथील नागरिकांच्या घरात घुसत आहेत.




      यापूर्वी रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.परंतु अद्याप सांबा विभागाकडून गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. पिंपरी जलसेन मधील हे धोकादायक वळण एका बाजूने चढाचा भाग असून दुसऱ्या बाजूला तीव्र उतार व वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा व वळणाचा वाहनचालकांना अंदाज येत नाही व त्यामुळे अपघात होतात. याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून देखील गतिरोधक बसविले जात नाहीत. नागरिकांच्या जीवावर बेतल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का ? सार्वजनिक बांधकाम विभागाला नेमके काय साध्य करायचे आहे ? असे अनेक सवाल यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 


आमच्या जीवावर बेतल्यावार प्रशासन जागे होणार का ?

अनेकदा मागणी करून देखील या धोकादायक वळणावर गतिरोधक बसविले जात नाहीत. याच ठिकाणी अनेकदा अपघात झालेले आहेत. आमच्या कुटुंबातील लहान मुलांना अंगणात खेळायला देखील भीती वाटते आहे. प्रशासनाकडून कधी गतिरोधक बसविले जातील. आमच्या कुटुंबातील माणसांच्या जीवावर बेतल्यावर प्रशासन जागे होऊन गतिरोधक बसविणार का ? असा संतप्त सवाल तेथील नागरिक देवेंद्र भंडारी यांनी केला आहे.


प्रशासकीय आदेश आल्यास तत्काळ गतिरोधक बसवू - गुंदेचा

या रस्त्यावरील गतिरोधक बसविण्याबाबत स्थानिक ग्रमोनाचायात ने लेटर हेड वर सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे आदेश आम्हाला आल्यास तत्काळ या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात येतील. अशी माहिती संजय गुंदेचा यांनी दिली.

 


 गतिरोधक नाही बसविले तर अपघाताचे प्रमाण वाढून नागरिकांना मनस्ताप होत आहे. आणि गतिरोधक बसविले तर वाहनचालकांना त्रास होत असल्याने सुप्रीम कोर्टाचे निर्देश वेगळे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये विषय घेऊन गतिरोधक बसवण्याच्या बाबतीत चर्चा करून विषय मार्गी लावण्यात येईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत येळाई यांनी दिली.

Post a Comment

0 Comments