![]() |
आनंदाने जगण्यासाठी एकतरी कला आत्मसात करावी - कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे
परभणी प्रतिनिधी
इंद्रधनू कला अकादमी परभणी आयोजित "महाराष्ट्राचा कलाशिक्षक- ध्यास कलेचा, कलाशिक्षणाचा" या उपक्रमशिल कलाशिक्षकाच्या ऑनलाईन मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स पारनेर जि. अहमदनगर येथील उपक्रमशिल कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे म्हणाले की प्रत्येकाने आंनंदाने जगण्यासाठी एकतरी कला आत्मसात केली करावी. त्यामुळे मनाला शांती मिळते व कंटाळवाणे न वाटता माणुस आनंदाने, समाधानाने जीवन व्यतित करतो.
कवडे सरांनी ए. टी. डी., जी.डि.आर्ट व ए. एम. असे कलेतील उच्च शिक्षण घेतले. स्केचिंग,निसर्गचित्र, रचनाचित्र,अक्षरगणपती, फलकलेखन या विषयातील प्रभूत्व व अनेक उपक्रमांच्या साह्याने विद्यार्थ्यांना कलेचे मार्गदर्शन केले. शाळेचा शासकिय रेखाकला परिक्षेचा निकाल नेहमी ९५ ते १०० टक्के असतो शिवाय राज्य गुणवत्ता यादीत त्यांचे विद्यार्थी असतात. शाळेच्या इतर उपक्रमात फलकलेखन, स्टेज सजावट, कार्यक्रम पत्रिका,शैक्षणीक साहित्य निर्मिती करून मोलाचे सहकार्य केले आहे. कवडे यांना फलकलेखनाचे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, उत्कृष्ठ निसर्गचित्र पुरस्कार , आदर्श कलाशिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. कलेने मला मान, सन्मान, प्रसिध्दी, ऐश्वर्य सर्व कांही दिले. नियमित कलासाधना केल्याने कला दर्जेदार बनते त्यामुळे नेहमी कलेची साधना करावी असे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन मुलाखत ऐकण्यासाठी सहभागी कला शिक्षकांचे अध्यक्षा शिवनंदा बागवाले यांनी स्वागत केले. कलाशिक्षक तथा सचिव माधव घयाळ यांनी मुलाखत घेतली व जे मुलाखतीत सहभागी झाले नाही त्यांनी युट्युबवरील मुलाखतीचे प्रसारणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

0 Comments